Ad will apear here
Next
करोना काळातील शिक्षणव्रत... स्क्रीनशिवाय!


करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग सध्या चालू असला तरी त्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या, वाढत जाणारे स्क्रीन अॅडिक्शन, त्याचे कौटुंबिक पडसाद आणि मुख्य म्हणजे या सुविधेच्या उपलब्धतेची स्थिती या सर्व गोष्टींचा विचार करता ‘ऑनलाइन शिक्षण’ म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असेच होण्याची शक्यता अधिक. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ने ‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ हा एक अभिनव उपक्रम आखून, सुमारे ७० वस्त्यांमध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. या अनोख्या उपक्रमाविषयी...
..........
करोना महामारीने सर्व जगालाच अंतर्मुख केलं. स्मार्ट, ग्लोबल आणि वेल-सेट अशा गृहीतकांना करोनाने ‘रात्रीत घर सोडण्यास’ भाग पाडलं. स्वाभाविकपणे सर्वच सामाजिक क्षेत्रं यामुळे प्रभावित झाली. यात मुलांच्या शिक्षणावर झालेला परिणाम हा अधिक दूरगामी आणि गंभीर स्वरूपाचा म्हणायला हवा. कारण हा परिणाम केवळ एखाद्या शैक्षणिक वर्षाच्या नुकसानापुरता मर्यादित नाही, तर भविष्यात सर्व क्षेत्रांसाठी सुयोग्य असे मनुष्यबळ उपलब्ध होण्यावरच या ‘करोना’नामक साडेसातीने सध्या मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग सध्या चालू असला तरी त्याच्या काही अंगभूत मर्यादा आहेत. सतत स्क्रीनसमोर राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या, वाढत जाणारे स्क्रीन अॅडिक्शन, त्याचे कौटुंबिक पडसाद आणि मुख्य म्हणजे या सुविधेच्या उपलब्धतेची स्थिती या सर्व गोष्टींचा विचार करता ‘ऑनलाइन शिक्षण’ म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असेच होण्याची शक्यता अधिक. 

अर्थात हे सर्वांना माहिती असूनही यावर दुसरा काहीही इलाज न सापडल्यामुळे बहुतांश जणांनी ‘something better than nothing’ असे सूत्र मनाशी ठेवत ‘ऑनलाइन शिक्षण’ घरात आणले. काही ना काही तरी मुलांच्या पदरात पडते आहे, असा विचार करून पालकही जरा आश्वस्त झाले; पण हे झाले ज्यांना स्मार्टफोन, टॅब वगैरे घेणे परवडते त्यांच्या बाबतीत. ज्यांच्या घराचाच आकार ‘दहा गुणिले दहा’ इतका आहे आणि ज्या घरांत तेल-शेंगदाणे वगैरे गरजेच्या शिध्यासाठीसुद्धा रोज झगडा करावा लागतो त्या घरातील मुलांनी काय करायचे? शिक्षण कसे घ्यायचे? की सोडून द्यायचा शिक्षणाचा विचार? जाऊ द्यायची वर्षे आणि मुले वाया? कोण करणार यांचा विचार? कुणाकडे आहे का वेळ इतका?

‘एमएनजीएल-कमर्शियल’चे डायरेक्टर संतोष सोनटक्के यांच्या हस्ते पुस्तिका प्रकाशन झाले.

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेने वरील प्रश्नांचे स्पष्ट उत्तर दिले आहे. ‘या मुलांच्या शिक्षणाचा विचार आम्हीच करणार, नव्हे ती आमची जबाबदारी आहे!’ हे ते स्पष्ट उत्तर आहे. अर्थात ही संस्था केवळ उत्तर देऊनच थांबली नाही, तर ‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ हा एक अभिनव उपक्रम आखून, सुमारे ७० वस्त्यांमध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणीदेखील ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ने करून दाखवली. सध्या ‘स्वानंद’च्या माध्यमातून सिंहगड रस्ता व कोथरूड परिसरातील सुमारे ३५ वस्त्यांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात लहान मुलांना संस्कारित करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे बाल-समृद्धी वर्ग, किशोरवयीन मुला-मुलींना जीवनाची सकारात्मक दिशा मिळण्यासाठी चालणारे किशोर-दर्पण प्रकल्प, प्रासंगिक आरोग्य शिबिरे, चिकित्सालये, विविध प्रशिक्षणे देऊन महिलांना आत्मनिर्भर करणारा महिला-जागृती उपक्रम अशा अनेक आयामांद्वारे ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ निरंतर कार्यरत आहे. 

याच वस्त्यांमधील मुलांच्या शिक्षणास मध्यवर्ती ठेवून आणि तिथे ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होण्यातील मर्यादा योग्य प्रकारे समजून घेत ‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ हा सशक्त पर्याय ‘टीम स्वानंद’ने समर्थ भारत पुनर्बांधणी योजनेअंतर्गत कार्यान्वित केला. 



या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती उपक्रम-पुस्तिकांनी. घरातील प्रत्येक गोष्टींमधून मूल काय काय शिकू शकते, छोट्या घरात बसून मनोरंजन आणि शिक्षण या दोहोंची सांगड कशी घालता येईल, त्याकरिता साधे सोपे उपक्रम कसे तयार करता येतील याचा व्यवस्थित विचार करून या उपक्रम-पुस्तिका ‘स्वानंद’मार्फत खास तयार करण्यात आल्या. मुलांना शिक्षणाशी जोडून ठेवायला हवे, हा विचार यामागे प्राधान्याने होता. मुलांच्या इयत्तांनुसार तीन गट तयार केले गेले व त्यानुसार उपक्रम-पुस्तिकांची रचना झाली. भाषा, गणित, विज्ञान या विषयामधील मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होऊ शकेल, असे साहित्य या पुस्तिकेत समाविष्ट केले गेले. कोणताही खर्च न करता घरातील उपलब्ध वस्तूंपासून तयार करता येऊ शकतील असे उपक्रमही या पुस्तिकेद्वारे मुलांना दिले गेले. पुस्तिकेचे स्वरूपही ‘चटकन अभ्यासात गुंतून जावे’ असे. ही पुस्तिका सिद्ध झाल्यानंतर तिचा रीतसर ई-प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 

विद्यार्थ्यांना मदत करताना पालक

यापुढील आव्हान होते ते या पुस्तिकेच्या प्रत्यक्ष वितरणाचे आणि विनियोगाचे. लॉकडाउनच्या काळात हे कसे साधावे? यात मुख्य योगदान दिले ते समृद्धी वर्गाच्या शिक्षिका – ज्या, त्या त्या वस्त्यांमधूनच नियुक्त केल्या गेल्या आहेत – आणि विद्यार्थिमित्र यांनी. ‘विद्यार्थिमित्र’ ही एक अभिनव कल्पना या उपक्रमाच्या निमित्ताने पुढे आली आणि ती पुढे चांगल्या पद्धतीने राबवलीही गेली. वस्तीमधील काही पालकांना पुस्तिका सोडविण्याबाबत अडचणी जाणवत होत्या. ते स्वाभाविकही होते आणि काहीसे अपेक्षितही होते. अशा पालकांना आणि त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी समाजातील उत्साही युवक-युवती, सज्जन शक्ती यांना ‘स्वानंद’ने थेट साद घातली आणि त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी समृद्धी वर्गशिक्षिका आणि विद्यार्थिमित्र यांना या एका प्रशिक्षण वर्गाद्वारे या प्रकल्पाची माहिती व कार्यपद्धती समजावून सांगितली गेली. त्यानुसार समृद्धी वर्गशिक्षिकांनी या पुस्तिका प्रत्यक्ष वितरित करण्याची जबाबदारी निभावली, तर या पुस्तिकेप्रमाणे अभ्यास, उपक्रमादि गोष्टी होण्यासाठी विद्यार्थिमित्रांनी आपला वेळ आणि बुद्धी खर्ची घालून ‘विद्यार्थिमित्र’ ही आपली उपाधी सार्थ केली.

या तरुण मित्रांनी वस्तीतील मुलांच्या पालकांना, घरातील मोठ्या सदस्यांना या पुस्तिकेची व्यवस्थित माहिती दिली आणि हा अभ्यास करण्यासाठी मुलांना आवश्यकतेनुसार मदत करण्याची विनंती केली. या अभ्यासाचा आढावा घेण्याचीही रचना पालकांना फोन करून किंवा प्रत्यक्ष मुलांच्या भेटीच्या माध्यमातून व्यवस्थित लावली गेली होती. ‘आपल्या मुलांची काळजी कुणाला तरी आहे’ या विचाराने भारावून गेलेले पालकही या उपक्रमात सक्रिय सहभागी होत गेले. हळूहळू आपल्या घरातील, परिसरातील गोष्टींमधूनही आपण खूप काही शिकू शकतो हा विश्वास मुलांना आणि पालकांना मिळत गेला. या अभिनव शिक्षणपद्धतीचे लाभ विद्यार्थ्यांच्या पदरी पडू लागले. कुठलेही स्क्रीन न वापरता झोळी ज्ञानाने भरू लागली. विशेष म्हणजे विद्यार्थिमित्र म्हणून पुढे आलेल्या स्वयंसेवकांनी पुढील एक वर्ष हे दायित्व निभावण्याचे व्रत आपण होऊन स्वीकारले. त्यामुळे हा उपक्रम स्थिरावण्यास आणि मुलांचे शिक्षण नीटपणे मार्गी लागण्यास मोलाची मदत झाली. 



सध्या ‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ हा उपक्रम सिंहगड रस्ता, कोथरूड, विद्यापीठ भाग, कसबा भाग, व पुणे शहराबाहेरील सहा ठिकाणी सुरू आहे. सुमारे ७० वस्त्यांमधील तीन हजार मुलांपर्यंत या उपक्रमाचे लाभ पोहोचले आहेत. एकूण ७० विद्यार्थिमित्र, ७० शिक्षिका व आठ अन्य सहयोगी सेवा संस्थादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. लाभ मिळालेली मुले, त्यांचे पालक आणि संबंधित सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून उपक्रम-आयोजन व कार्यवाहीबाबत अत्यंत सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिक्रिया येत आहेत. कुठलाही प्रकल्प आकाराला येण्यासाठी उत्तम सांघिक कामाची गरज असते. ‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ प्रत्यक्ष आकाराला येण्यासाठीसुद्धा ‘स्वानंद’चे प्रशासकीय अधिकारी आणि समन्वयक यांचा सुंदर समन्वय आणि ‘स्वानंद’चे अध्यक्ष सुधीर काळकर व सचिव रवींद्र शिंगणापूरकर यांच्यासोबतच संस्थेच्या कार्यकारी मंडळाने या उपक्रमासाठी दिलेला भरभक्कम आधार या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरल्या. या सांघिक प्रयत्नांच्या बळावरच हे शिक्षणव्रत फलदायी ठरले. 

- सचिन कुळकर्णी 
प्रशासकीय अधिकारी, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, पुणे
मोबाइल : ९७६६८ १९८२१
वेबसाइट : http://www.swanandjan.org/
.......
‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ या उपक्रमाबद्दलचे हे काही प्रातिनिधिक अभिप्राय

इतिहासात नोंद व्हावी असा उपक्रम स्वानंद संस्थेच्या माध्यमातून राबवला जात आहे. कारण लॉकडाउनच्या काळात अत्यंत दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे विद्यार्थी हा आहे. अशा वेळी ‘स्क्रीनशिवाय शिक्षण घरच्या घरी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ही योजना महानगरात सर्वत्र राबवण्यात यावी. 
- महेश करपे, बांधकाम व्यावसायिक, महानगर कार्यवाह, रा. स्व. संघ. पुणे महानगर

पुस्तिकेचे दोन्ही भाग अतिशय उपयुक्त आहेत आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. माझी मुलगी पाचवीमध्ये शिकते. या पुस्तिकेमधील उपक्रमांमुळे तिच्या कला-गुणांना वाव मिळतो आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे. यातून भाषिक, वाचिक, कायिक या गोष्टींचाही विकास होण्यास मदत होत आहे!
- विनय शाळिग्राम, पालक, दांगटनगर वस्ती, पुणे 

ह्या वेळच्या पुस्तिकेमध्ये क्रिएटिव्ह गोष्टींचाही समावेश केला आहे ते चांगले झाले. मुलांना नुसतेच अभ्यासाचे उपक्रम नाहीत, तर ग्रीटिंग कार्ड, पदार्थ बनविण्याची पद्धत ह्याबद्दलचे उपक्रमही आहेत. असे उपक्रम मुलांना करायला आवडतात. पहिली-दुसरीच्या मुलांना जोड्या जुळवा, चित्र ओळखणे असे उपक्रम आवडतात, असा माझा अनुभव आहे. अशा स्तुत्य उपक्रम पुस्तिकेबद्दल आभार!
- भक्ती कुलकर्णी, विद्यार्थिमित्र

‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ या पुस्तिकेतील अभ्यासक्रम अतिशय सुंदर आहे. याचबरोबर इयत्तेनुसार असणारे वेगवेगळे उपक्रम मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करत आहेत. विषयानुसार असणाऱ्या कृतीमुळे मुले आवडीने उपक्रम करतात. अडचणी आल्यास विचारत असतात. ही पुस्तिका दिल्याबद्दल मुले, पालक आणि माझ्याकडून खूप धन्यवाद!
- सौ. मंजू नितीन शिंदे, शिक्षिका, साईनगर

बंद होऊ पाहणारी शिक्षणाची दारे ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी ‘स्क्रीनशिवाय शिक्षण’ या उपक्रमाद्वारे आपल्या अथक प्रयत्नांतून पुन्हा एकदा सताड उघडी केली आणि ‘चलो जलाये दीप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा है’ ही आपली मूळ कार्यप्रेरणा सिद्ध केली. आता यातून तयार झालेले विद्यार्थी जेव्हा ‘विद्यार्थिमित्र’ होऊन हा शिक्षणवारसा पुढे नेतील, तेव्हा हा उपक्रम खऱ्या अर्थाने फळाला आला असे म्हणता येईल, किंबहुना लक्ष्य तेच तर आहे!
- महेंद्र वाघ (स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, कार्यकारी मंडळ सदस्य) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SVTOCT
Similar Posts
‘आमचा करोनामुक्तीचा अनुभव’ करोनाचे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत आले आहे आणि काही जणांच्या घरात ते येऊनही गेले असेल. तीव्र लक्षणे नसतील, तर होम क्वारंटाइन राहून आणि डॉक्टरी सल्ल्याचे पूर्ण पालन करून या संकटातून सहीसलामत बाहेर पडता येते. घाबरून न जाता केवळ पाळायला हवा तो संयम. ही गोष्ट आहे पुण्यातील अशाच एका दाम्पत्याची, ज्यांचा
करोनाला गांभीर्याने घ्या : डॉ. अविनाश भोंडवे (मार्गदर्शनपर व्हिडिओ) पुणे : ‘विविध माध्यमांतून सर्वत्र करोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही, अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत,’ याबद्दल खंत व्यक्त करून ‘करोनाला गांभीर्याने घ्या,’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले. पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने
स्वमग्नांसाठी ‘प्रसन्न’पणे कार्यमग्न असलेली संस्था स्वमग्नता अर्थात ऑटिझम या समस्येचे प्रमाण अलीकडे वाढू लागले आहे. ही समस्या असलेली मुले स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे त्यांच्या विकासात अडचणी येतात. अशा मुलांसाठी पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटर २००० सालापासून कार्यरत आहे. या मुलांच्या विकासासाठी, त्यांना स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी ही संस्था करत असलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत
दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था ज्यांना हात नसतात, त्यांचेही भवितव्य चांगले असू शकते... ज्यांना पाय नसतात, तेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात... ज्यांना डोळे नसतात, तेही डोळस व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात... या गोष्टी सत्यात उतरविल्या आहेत पुण्यातील ‘इडार्च’ या संस्थेने. दिव्यांगांना शिकवण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिवधनुष्य या संस्थेने पेलले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language